धक्कादायक : स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर 17 मुलींची छेडछाड आणि लैंगिक शोषणाचा आरोप

Foto
नवी दिल्ली : दिल्लीतील वसंतकुंज येथील एका आश्रमाचे संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर सुमारे 17 विद्यार्थिनींशी छेडछाड आणि यौन शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वसंतकुंज (नॉर्थ) पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांची कथित व्हॉल्वो कार पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवर बनावट 39 UN 1 ही राजनयिक नंबर प्लेट आढळली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आश्रम प्रशासनाने आरोपीला पदावरून हटवले आहे. दिल्ली पोलीस आरोपीच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. आरोपीचे शेवटचे लोकेशन आगरा येथे आढळले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच, पीडित विद्यार्थिनींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

विद्यार्थिनींवर लैंगिक शोषणाचा आरोप


दिल्ली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी वसंतकुंज नॉर्थ पोलीस ठाण्यात श्रीशृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तांचे प्रशासक पीए मुरली यांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये EWS स्कॉलरशिप अंतर्गत PGDM (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट) अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थिनींवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महिला प्राध्यापकांवरही आरोप 


तपासादरम्यान, 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले, त्यापैकी 17 जणींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांनी शिवीगाळ, अश्लील व्हॉट्सअॅप मेसेज, एसएमएस आणि अयोग्य पद्धतीने संपर्क ठेल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर, संस्थेत प्राध्यापक आणि प्रशासनात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर आरोपीच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव टाकल्याचा, आरोपही करण्यात आला आहे.